छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद!

विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगड : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत 12 नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी आहेत. दरम्यान, कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान सुरु आहे.
शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त
जवानांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना उत्तम उपचारासाठी उच्च केंद्रात पाठवण्यात येणार आहे,
नक्षलवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर फोर्स घटनास्थळी रवाना करण्यात आला. विजापूर डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले. डीआयजी कमलोचन कश्यप यांनी सांगितले की, सैनिकांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही. हे एक मोठे ऑपरेशन आहे. आकडा स्पष्टपणे सांगता येणार नाही, मात्र नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.