सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तरुणाला अटक!

पिंपरी : सांगवी येथे सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आशिष वाघमारे (नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम गायकवाडच्या हातात पिस्तूल असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने तो व्हिडिओ स्वतःचा असल्याचे कबूल केले. व्हिडिओमधील पिस्तूल त्याचा मित्र आशिष वाघमारे याचे असून, पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने त्याने ते पिस्तूल ओमकडे लपवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी ओमने लपवून ठेवलेले ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक!
पिंपरी : बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ घडली.
उज्वल विनोद लवे (वय २३, पिंपरी) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार जयवंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते असे एकूण ५१ हजार १०० किमतीची शस्त्रे सापडली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.