सायकलिंग संस्कृतीला पिंपरीत चालना

पिंपरी, प्रतिनिधी : सायकलिंग संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने युरोपीय तंत्रज्ञानावर आधारित ईझीपेडल पब्लिक राईडशेअर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी येत्या ऑगस्टपासून होईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर, वाकड आणि विशालनगर भागांचा समावेश केला जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊन शहराच्या बस रॅपिट ट्रान्झिट (बीआरटी) आणि मेट्रो यंत्रणेसाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत कार्यक्षम कनेक्टिव्हिटी मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. उपक्रमासाठी सार्वजनिक ठिकाणे, सामुदायिक जागा, निवासी क्षेत्रे आणि व्यावसायिक झोनमध्ये नियोजनपूर्वक सौर पॅनेलद्वारे चालणारे स्मार्ट डॉक स्थापित करण्यात येणार आहेत.
शहरातील अभियंता निखील देशमुख आणि प्रत्युष श्रीनिवासन यांनी ईझीपेडल स्टार्टअपची स्थापना केली आहे. युरोपियन मानके आणि जागतिक मॉडेल्सपासून प्रेरणा घेऊन त्यांनी नाविन्यपूर्ण, कार्यक्षम राइडशेअर प्रणाली विकसित केली आहे. पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरमध्येच सध्या या स्टार्टअपचे कामकाज चालू आहे. प्रकल्प राबविण्यासाठी आर्किटेक्ट आशिक जैन, पालिकेच्या वाहतूक आणि परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, चित्रा पनवार यांनी पुढाकार घेतला आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. शहरातील सायकल ट्रॅकचा वापर वाढेल. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, तो येत्या ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरात अन्य ठिकाणी तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल, असे सांगण्यात आले.
काय आहे उपक्रम?
या उपक्रमांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भाडेतत्त्वावर सायकल उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी परवडणारा आणि सोयीस्कर वाहतुकीचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होईल. घरापासून बीआरटी किंवा मेट्रो स्थानकापर्यंत सहजपणे पोहचता येणार आहे. शहरामध्ये मोटारविरहित प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.