फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
लाईफस्टाईल

सहलीचं नियोजन कसं कराल?

सहलीचं नियोजन कसं कराल?

हातात आलेल्या पगाराचं नियोजन अनेकजण करतात. त्या पगारात अनेक वाटे ठरलेले असतात. असा एखादा वाटा तुम्ही सहलीसाठी किंवा ट्रिपसाठी राखून ठेवता का? नसेल तर सहलीचं उत्तम नियोजन करण्यासाठी असं आर्थिक नियोजनही आवर्जून करा. बजेट योग्य असलं की कोणतीही सहज यशस्वी होतेच.

नियोजनशून्य गोष्टी करण्यात काहीही मजा नाही. नियोजन न करता प्रवासाला गेल्यास, नंतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. सहलीच्या नियोजनाचा विषय निघालाच आहे तर, सर्वात आधी त्या सहलीचं बजेट ठरवलं पाहिजे. प्रवास कसा करायचा, राहण्याचं ठिकाण, जेवणाची सोय या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यायला हवं.

कोणत्याही सहलीत सर्वात मोठा खर्च प्रवासाचाच असतो. परदेशात फिरायला जायचं असेल तर विमानप्रवास सर्वात सोयीचा आहे आणि तेवढाच खर्चिक सुद्धा. त्यामुळं तुमचा परदेशात टूरला जाण्याचा विचार असेल तर विमानाच्या तिकिटांचं बुकिंग आधीच करून ठेवलेलं बरं. विमानाच्या तिकिटांचा दर सिजनमध्ये, वीकेंडला आणि वीकडेजला वेगळा असतो. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी एक तर आधीच बुकिंग करून ठेवणं आणि दुसरं म्हणजे विकेंड ऐवजी वीकडेजला ट्रॅव्हल करणं जास्त सोयीचं आणि स्वस्त ठरेल.

वाहन कोणतं वापराल?
जर तुम्ही जवळच्या प्रवासासाठी जात असाल तर स्वतःच्या गाडीनं किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचा विचार करू शकता. प्रवास खर्च कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक नक्की वापरावी. एखाद्या देशात किंवा शहरात सार्वजनिक वाहतुकीचा खर्च किती आहे याची अंदाजे माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल आणि जर तुम्ही भारतातच कुठं तरी फिरायचा विचार करत असाल तर रेल्वेने प्रवास करणं फायद्याचं ठरेल. भारतात रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित समजला जातो. रेल्वेच्या तिकिटांचे दर सिजन नुसार बदलत नाहीत पण सुट्ट्या आणि उत्सवाच्या काळात ऐनवेळी तिकीटं मिळत नाहीत. त्यामुळं आधीच तिकीट बुक करून ठेवणं कधीही सोयीचं.

खर्चाचं नियोजन
प्रवास करून जेव्हा इच्छितस्थळी आपण पोहोचतो तेव्हा पहिला प्रश्न असतो, तो राहण्याचा. सहलीच्या मुक्कामाचे दिवस ठरवून त्यानुसार हॉटेल, गेस्टहाउस किंवा हॉस्टेल ठरवता येतं. जास्त दिवसांचं नियोजन असेल तर अपार्टमेंट्स सुद्धा भाड्याने मिळतात. तुम्ही भारतात फिरत असला तर धर्मशाळेतही राहू शकता. भारतात अनेक मोठ्या शहरात प्रसिद्ध देवस्थान आणि त्यांचे भक्त निवास असतात तेही अगदी स्वस्तात. टूरचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही या पर्यायांचाही विचार करू शकता. अशा ठिकाणी मोफत जेवणाची सोय असते त्यामुळं तुमच्या जेवणाच्या खर्चात बरीच बचत होते. ओयो हॉटेल्स, बुकिंग.कॉम किंवा मेक माय ट्रिप सारख्या वेबसाईट्सवर तुम्हाला राहण्यासाठी एका दिवसासाठी किती खर्च होऊ शकतो याची कल्पना येईल.

जेवणाचा खर्च
काही हॉटेल्स, होस्टेल्समध्ये मोफत नाश्त्याची सोय असते. तुम्ही राहत असलेल्या हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये मोफत नाश्त्याची सोय आहे का याची चौकशी करून घ्या त्यातूनही तुमची बरीच बचत होऊ शकते. काही हॉटेल, हॉस्टेल आणि अपार्टमेंट्समध्ये स्वयंपाक करून खाण्याची सुद्धा सोय असते. तुमच्या टूरच्या खर्चात जेवणाच्या खर्चाचा मोठा भाग असतो. त्यामुळे याचं देखील नियोजन करणं गरजेचं ठरत. ज्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेला आहात तिथलं स्थानिक अन्न (लोकल फूड) ट्राय करा ते तुम्हाला स्वस्तात मिळू शकतं. पर्यटन स्थळांवर गेल्यावर अनेकांना स्कूबा ड्रायविंग, बंजी जम्पिंग किंवा हॉट एअर बलुनसारख्या राईड करण्याचा तर काहींना शॉपिंगचा मोह आवरत नाही. या खर्चाचं सुद्धा नियोजन करून ठेवणं महत्वाचं ठरतं.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"