समाजवादी पक्षाचे खासदार मुंबई भेटीवर

मुंबई, विशेष प्रतिनिधी : समाजवादी पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशातील पक्षाचे सर्व ३७ खासदार शुक्रवारी मुंबई भेटीवर येत आहेत. या भेटीत ते सिद्धीविनायक मंदिर, चैत्यभूमी, मणिभवन आणि शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी म्हणाले, देशात समाजवादी पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा बनला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा ‘जश्न ए फतह’ १९ जुलै रोजी रंगाशारदा सभागृहात होणार आहे. त्यासाठी सर्व खासदार मुंबईत येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला महाविकास आघाडीकडून अधिक जागांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र हा समाजवाद्यांचा गड राहिलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.