विधानपरिषदेसाठी भाजपकडून गोरखेंना उमेदवारी

भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे युवा नेते अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गोरखे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह परिणय फुके व पुण्यातील योगेश टिळेकर यांनाही विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे.
विधान परिषदेच्या 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी आज दुपारी जाहीर केली. त्यात अमित गोरखे यांच्या नावाचाही समावेश आहे. गोरखे यांचे नाव जाहीर होताच शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. गोरखे यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे तसेच सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर व परिणय फुके यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.
विधानसभेतून विधानपरिषदेवर भाजपच्या कोट्यातून पाठविण्यासाठी पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांच्या नावाची शिफारस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे केली होती. त्यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक यांचाही समावेश होता. त्यामुळे गोरखे यांना संधी मिळते का, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे (Pimpri) लक्ष लागले होते.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला आहे. त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे (Pimpri) यांचा समावेश होता. केंद्रीय नेतृत्वाकडून गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
गोरखे यांना संधी मिळाल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेतील आमदार महेश लांडगे व अश्विनी जगताप तर विधानपरिषद सदस्या उमा खापरे असे भाजपचे तीन आमदार असून गोरखे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यास चार आमदार होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.