फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

लोणावळ्यात शनिवारी २३२ मिमी पावसाची नोंद

लोणावळ्यात शनिवारी २३२ मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी (३ ऑगस्ट) रोजी २४ तासात लोणावळा शहरात २३२ मिमी (९.१३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. आज देखील सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. सकाळी ५ तासात लोणावळ्यात १५० मिमी पाऊस झाला. दुपार पासून पावसाने काहीशी उघडीत घेतली आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर जमा झालेले पाणी हे आता कमी होऊ लागले आहे.

लोणावळा शहरातील शहाणी रोड, नारायणी धाम मंदिरासमोरील रस्ता, नांगरगाव रस्ता, बापदेव रोड यासह बद्री विशाल सोसायटी, पांगारे चाळ, निसर्ग नगरी, लोणावळा बस स्थानकाचा परिसर, खंडाळा रोहिदास वाडा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले. तर रस्ते जलमय झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने यामध्ये देखील पाणी घुसून व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने रस्त्यांवर साचलेले पाणी हे वाहून जाऊ लागले आहे.

हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. लोणावळा शहर व ग्रामीण भागात सर्वत्र कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत ४०४७ मिमी (१५९.३३ इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लोणावळा शहरात जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहू लागल्याने धरणाकडे जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. कार्ला, मळवली, देवले, वाकसई चाळ, सदापूर या भागामध्ये इंद्रायणी नदीच्या पुराचे पाणी पसरले आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव करत काही नवीन हॉटेल्स तयार करण्यात आले आहेत त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून हॉटेलच्या पायऱ्यांपर्यंत पाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते. आई एकवीरा देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता तसेच पाच पायरी मंदिराच्या पुढे डोंगरावरून वाहणारा धबधबा वेगाने वाद असल्याने पायऱ्यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"