लोणावळ्यात उच्चांकी पावसाची नोंद

पिंपरी, प्रतिनिधी : लोणावळ्यात गेल्या २४ तासांत मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात २७५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसाने लोणावळा परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचण्यासाठी कसरत करावी लागत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये पावसाने तुफान झोडपून काढले आहे. दिवसभरात या मोसमातील उच्चांकी २७५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
मळवलीमध्ये एका बंगल्यात २० ते २२ पर्यटक अडकले होते. या पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले आहे. हे सगळे पर्यटक बंगल्यात होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर येऊन पाहिलं असता संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे दिसून आले. या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.