`लाडकी बहीण` योजनेचे ऑफलाइन अर्जही भरणार

पिंपरी, प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी आणि लागणारा वेळ लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. पात्र महिलांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने घेऊन ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत बैठक झाली. त्या वेळी सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, बाबासाहेब गलबले या वेळी उपस्थित होते.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्यावतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज भरणे तसेच स्विकृतीसाठी १० जुलैपासून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध ठिकाणी अर्जस्विकृती केंद्र उभारण्यात आली आहेत. नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी कामकाज पाहत आहेत.
लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येतील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर हे सर्व अर्ज क्षेत्रीय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरून पूर्तता केली जाईल, यादृष्टीने काम करण्याच्या सूचना सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अर्ज भरताना लाभार्थींच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. तो अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे. यासाठी पालिकेच्यावतीने एक विशिष्ट क्रमांक तयार करण्यात येणार असून, त्यावरून लाभार्थांना संपर्क करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
नियुक्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, समन्वयाद्वारे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा, दैनंदिन कामकाज अहवाल वेळोवेळी द्यावा, पालिकेच्यावतीने लाभार्थ्यांशी संपर्क साधावा आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्येचे निराकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.