राज्यभरात पावसाचा हाहाकार

पुणे, प्रतिनिधी : राज्यभरात आज सकाळपासून पावसामुळे हाहाकार माजला आहे. काल दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये धरणसाठ्यात वाढ झाली आहे. धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुण्यात सिंहगड रोडवरील काही सोसायट्यांमधून पहाटे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. प्रशासनानं भोंगे आणि सायरन वाजवून नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. आज पुणे, लोणावळा येथील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातील अनेक भागांत अक्षरश:छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या. जवळपास पाच सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं. एकतानगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे. घरात पाणी घुसून गाद्या भिजल्या आहेत, तर अनेक सामान पाण्यासोबत वाहून गेलं आहे. नागरिकांना सुखरुप घरातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी दाखल झाल्या आहेत.पुण्याचे रस्ते जलमय झाले असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. कोयना धरणक्षेत्रात सेकंदाला ७५ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
राधानगरी धरण १०० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राधानगरी धरण १०० टक्के भरलं आहे. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. एका स्वयंचलित दरवाजा मधून सुमारे 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उल्हास नदीने गाठली इशारा पातळी
कल्याणच्या उल्हास नदीने इशाराची पातळी गाठली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तहसीलदारांनी नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हा पाऊस असाच कोसळत राहिला तर नदी धोकादायक पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना ये जा करण्याची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आली आहे .सकाळच्या सत्रात विद्यार्थी शाळेत आले असतील तर त्यांना सुरक्षित घरी पोहचवा, अशा सूचना मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमाच्या शाळांना सुटी जाहीर झाली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
बोरिवलीहून वांद्राच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे एकूणच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातच पावसाचा जोर थोड्यावेळानं वाढला आणि वाहतुकीला अडथळा आला.पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे.अशातच या पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकी सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झाला आहे. कांदिवली, मालाड,जोगेश्वरी,गोरेगाव,अंधेरी विलेपार्ले आणि सांताक्रुज पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली असून यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास देखील उशीर होत आहे.
रायगडमध्ये काय?
रायगडमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागोठण्यात अंबा नदीचे पाणी शिरले आहे. संपूर्ण नागोठणे शहराला आंबा नदीचा विळखा बसला आहे. जिल्हा प्रशासनाने नागोठणे शहराला अलर्ट दिला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे.