रवी लांडगे उद्धव गटाच्या वाटेवर

पिंपरी, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सहाजिकत भोसरी विधानसभा मतदार संघाचे राजकारण आता ढवळून निघणार आहे. महाविकास आघाडीच्या गोटात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक रवी लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे होत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. पक्षाची एकहाती सत्ता असताना पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे न घडल्याने त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात दंड थोपटले. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही उपेक्षा केली, अशी खंत व्यक्त करीत पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून या नवीन समीकरणांचा श्री गणेशा केलेलाच आहे. त्यानंतर आता रवी लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन मतदारसंघातील ठोकताळ्यांना धेद दिला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पक्ष रवी लांडगे यांनी प्रवेशासंदर्भात चर्चा देखील केली आहे.
या निर्णयानंतर रवी लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. त्या अनुषंगाने त्यांनी या पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. परंतु, राज्यातील राजकारणात उलथापालथ होऊन अजित पवार यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवित सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रवी लांडगे यांची कोंडी झाली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातही फूट पडली. या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरदचंद्र पवार गटात सहभागी झाले. त्यांनी आमदार लांडगे यांच्याविरोधात शड्डू थोपटला. आता पुढील आठवड्यात शक्तीप्रदर्शन करीत रवी लांडगे शिवसेनेचे मशाल चिन्ह हाती घेतील, असे सांगण्यात आले.
रवी लांडगे यांचे म्हणणे काय?
भारतीय जनता पक्षाने केलेला राजकीय अन्याय सर्वश्रृत आहे. त्यामुळे मी शिवसेनेबरोबर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होईल. भोसरी मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. ती आगामी विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल.