मुख्याधिकारी निलंबित

तळेगाव, प्रतिनिधी : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. मद्य प्राशन करून केलेला अपघात तसेच नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबत सोमवारी (आठ जुलै) आदेश दिले आहेत.
मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी एक जून रोजी मद्य प्राशन करून कार चालवली. निष्काळजीपणे कार चालवून त्यांनी शहरातील दोन वाहनांना धडक दिली. अपघात केल्यानंतर ते पळून गेले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एन. के. पाटील यांच्या रक्ताची न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यामध्ये त्यांनी मद्य प्राशन करून वाहन चालवल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याचबरोबर एन. के. पाटील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आक्षेपार्ह, असभ्य आणि अशोभनीय वर्तन करत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांनी राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणे तसेच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत त्यांना 8 जुलैपासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांचे निलंबन असणार आहे
….