भारतीय रेल्वेचं का होतंय कौतुक?

मुंबई, विशेष प्रतिनिधी : जगभरात मायक्रोसोफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीवर मीम्सचा पाऊस पडत असताना नेटकऱ्यांनी भारतीय रेल्वेचं भरभरून कौतुक केलं आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्वर डाऊन झाला आणि जगभरातल्या अनेक सेवांवर परिणाम झाला, अगदी विमानंही थांबली. पण या डाऊनचा याचा परिणाम भारतीय रेल्वेवर मात्र झाला नाही. खुद्द भारतीय रेल्वेनं ही बाब स्पष्ट केली आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावच झाला

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सर्व्हर डाऊन झाल्यानंतर जणू जगच थांबल्याचे दिसून आले. याचा परिणाम विमान कंपन्या, दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांवर झाला. एअरलाइन्सवरही याचा परिणाम दिसून आला. अशावेळी भारतीय रेल्वेने मात्र आश्चर्यकारक बाब सांगितली, आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. भारतीय रेल्वेने सांगितले की, मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याने भारतीय रेल्वेवर (Indian Railway) कोणताही परिणाम झाला नाही, त्यांची रेल्वे तिकीट प्रणाली, कंट्रोल ऑफिस ऑटोमेशन आणि इतर रेल्वे सेवांवर या आउटेजचा कोणताही परिणाम नाही. वेळापत्रकानुसार गाड्या धावत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या आऊटेजमुळे संपूर्ण जगाची यंत्रणा हादरली असताना सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचे मात्र भरभरून कौतुक होतंय. तर मायक्रोसॉफ्टच्या आउटेजनंतर, सोशल मीडिया यूजर्स मायक्रोसॉफ्टला ट्रोल करत आहेत. “मायक्रोसॉफ्ट का बाप भारतीय रेल्वे,” असं म्हणत एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे, तर दुसऱ्याने म्हटले की, भारतीय रेल्वे अजूनही प्रवासाचे सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह साधन आहे.
भारतीय रेल्वेत असं काय आहे विशेष?
भारतीय रेल्वेशी संबंधित सर्व सेवा सुरळीत सुरू राहिल्या. यामध्ये तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन कंट्रोल ऑफिस ऑटोमेशन आणि इतर रेल्वे सेवांचा समावेश आहे, तसेच या सर्व सेवा 1999 मध्ये Y2K समस्यांमुळे CRISIS प्रवासी आरक्षण प्रणालीवर विकसित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट बंद झाल्यानंतरही रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही.” सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) ही रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे. CRIS हे सक्षम IT व्यावसायिक आणि अनुभवी रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक अनोखे संयोजन आहे जे त्यास महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जटिल रेल्वे IT प्रणाली यशस्वीपणे वितरित करण्यास सक्षम करते. स्थापनेपासून, CRIS भारतीय रेल्वेच्या अनेक प्रमुख क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर विकसित आणि देखरेख करते.