प्लास्टिक पृथ्वीतलावरून संपवता येईल का?

पृथ्वीतलावरून प्लास्टिक संपवणं इतकं सोपं आहे?, असा विचार केल्यानंतर लक्षात आलं की गेल्या काही वर्षात जागतिकस्तरावर प्लास्टिकचा विषय चर्चेत आला आहे. प्लास्टिक बंदीचा विषय निघाला की त्या भोवती असलेल्या कित्येक रोजगारांचं काय? असा ही प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक प्लास्टिकला पर्याय असू शकतो का, हे सुद्धा शोधावं लागेल. या जागतिक प्रयत्नात आपला खारीचा वाटा काय असेल? याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे.
-सीमा देसाई
प्लास्टिकचं प्रदूषण संपविण्यासाठी जागतिकस्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. प्लास्टिक हे पृथ्वीवरचं मोठं संकट असल्याचं एकमत प्लास्टिक उद्योगातील नेत्यांमध्ये झालं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने विविध देशांचे प्रतिनिधी, प्लास्टिक उद्योगातील प्रतिनिधी, पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ, कचरावेचक, आदिवासी नेते यांच्या सहभागाने प्लॅस्टिकच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, जागतिकस्तरावर प्रयत्न सुरू झालेले असताना आपण एक सुजाण नागरिक म्हणून प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करण्यासाठी आणि कालांतराने आपल्या दैनंदिन आयुष्यातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी काही पावले उचलू शकतो का, याचा विचार झाला पाहिजे. पूर्वी साधारणपणे, घरातले टब, बादल्या अशा वस्तू आणि कॅरीबॅग्ज पुरते मर्यादित असलेले प्लॅस्टिक आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. त्यामध्ये इतके वेगवेगळे प्रकार आणि वैविध्यपूर्ण दर्जाची आकर्षक उत्पादने तयार झाली आहेत की ती मानवी मनाला सहज भुरळ पाडतात. त्यामुळे प्लास्टिक हे मानवासाठी आणि संपूर्ण पृथ्वीसाठीच कितीही धोकादायक आहे, याची पूर्ण जाणीव असतानासुद्धा आपण त्याला आपल्या आयुष्यातून अजूनही विलग करू शकलेलो नाही.

प्लॅस्टिकचा कचरा रोजच
मुळात प्लास्टिक हा विषयच इतका मोठा आहे की त्यात काय मांडावं आणि काय वगळावं हे अतिशय कठीण आहे. सकाळी उठल्यापासून दात घासण्याच्या ब्रशपासून रात्रीच्या नाइट लॅम्पपर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकचाच बोलबाला आहे. भाजी, फळांच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे पॅकिंग, पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे, स्वयंपाकघरातले धान्य – डाळींचे कंटेनर, मुलांची खेळणी, शालेय साहित्याच्या वस्तू, आणि घरात लागणाऱ्या खुर्चीपासून असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू प्लास्टिकच्याच तयार केलेल्या असतात. फक्त प्रत्येक वस्तूमध्ये वापरलं जाणारं प्लास्टिक हे वेगळ्या प्रकारचं असतं. प्लास्टिक म्हणजे ते विघटन होऊ शकतच नाही. फक्त काही प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर होऊ शकतो इतकंच. त्यामुळे रोज घरातून जाणाऱ्या कचऱ्यातसुद्धा प्लास्टिकचा मोठा समावेश असतो. कचरा वेचकांना असं प्लास्टिक वेगळं करत रहावं लागतं. या सगळ्याचा विचार करून सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरून टाकून देण्याजोग्या प्लास्टिकवर सरकारनं बंदी घातली घातली आहे. पण याचं उत्पादन होतच राहात असतं. त्यामुळे त्याचा पुनर्वापर कसा आणि कुठे करता येईल त्याबाबतचं तंत्र विकसित झालं पाहिजे.
होऊ शकते का प्लास्टिक बंदी?
सिंगल यूज प्लास्टिक हे एकदा वापरून फेकलं की त्याचा कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा होतो. नाले, नदी, गटारं आणि जमिनीवर उघड्या परिसरात ते साठून राहतं. नाले, गटारी तुंबतात. आणि मग पावसाळ्यात त्याच परिसरातील लोकांना साचलेल्या पाण्याचे परिणाम भोगावे लागतात. एकदाच वापरून फेकून देण्याचं साधन म्हणजे पत्रावळ. यातली पानं आणि काड्या या जैव विघटनशील अशतात त्यामुळे त्या कचऱ्याची माती आणि खत तयार होतं. पण आता जेवणासाठी कुठेच याचा वापर होत नाही. त्याची जागा थरमाकोलच्या प्लेट्सने घेतली आणि कचऱ्यात वाढ झाली. आता डिस्पोजेबल प्लेट्स तयार झाल्या आहेत पण त्या तुलनेने जास्त किमतीच्या असतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पाहता किती लोक त्याचा वापर करत असतील, माहीत नाही. आता विकसित तंत्रानुसार रस्ते बांधणीमध्ये काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर होतो, म्हणजेच प्लास्टिकचा पुनर्वापर केला जात आहे, ही देखील स्वागतार्ह बाब आहे.
वैद्यकीय क्षेत्रातल्या प्लॅस्टिकचं काय?
पूर्वी इंजेक्शन दिल्यानंतर काजेच्या सिरींज उकळत्या पाण्यात ठेवून निर्जंतुक केल्या जात असत आणि पुन्हा वापरात आणल्या जात असत. पण आता एकदा वापरलेल्या सुई दुसऱ्या रुग्णाला वापरली जाऊ नये, असा विचार पुढे आला. त्यामुळे आता सुयाच नव्हे तर सिरींज सुद्धा एकदा वापरून टाकून दिल्या जातात. सिरींज प्लास्टिकची असते, सलाइनच्या बाटल्या, त्यांचं पॅकिंग हे सुद्धा प्लास्टिकमध्येच होत असतं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातला प्लास्टिकचा वापरही मोठा आहे. प्लास्टिक विघटनाला हजार वर्ष लागतात असं म्हणतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातून इतक्या मोठ्या प्रमाणावर गोळा होणारा कचर कधी विघटित होणार ही गंभीर समस्या आहे.
पार्सलसाठी डबे आणा..
हॉटेलमधून पार्सल आणणे या प्रकारातही प्लॅस्टिकचे डबे मोठ्या संख्येने वापरले जातात. नंतर ते डबे घरात आणल्यानंतरही साठवणीच्या, फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अशा लहानसहान गोष्टींमध्ये वापरात येतात. पण जेव्हा प्लास्टिकच्या वापरावर कठोर निर्बंध आले तेव्हापासून अनेक हॉटेलचालक शिल्लक राहिलेलं अन्न पॅक करून देण्यास नकार देऊ लागले, काहींनी त्यासाठी प्लास्टिक वापर करावा लागतो म्हणून जास्तीचे चार्जेस आकारायला सुरुवात केली. तर काही ठिकाणी जेवण पार्सल घरी न्यायचंय म्हणून ऑर्डर दिल्यानंतर येतानाच घरचे डबे घेऊन या म्हणून बोर्ड लावायला सुरूवात केली. निर्बंध कठोर झाल्यानंतर प्रत्येक घटक आपल्यापरीने खबरदारीची पावलं उचलू लागला, हे ही नसे थोडके.
पाण्याचा वापर वाढेल का?
• प्लाल्टिक किंवा थरमाकोलच्या प्लेट्सचा वापर बंद केला तर स्टीलची ताटं, वाट्या, चमचे, ग्लास आणि भांडी वापरात घ्यावी लागतील.
• त्याच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरावे लागेल.
• बफे पद्धतीच्या जेवणात स्टीलची ताटं हाताळण्यास जड जातील.
• वेगवेगळ्या प्लेट्स तयार करणारे कारखाने कित्येक हातांना रोजगार देतात.
• बहुसंख्य लोक आता प्लास्टिक उद्योगावर अवलंबून आहेत. त्यांच्या हातचा रोजगार जाईल आणि मग बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल.
.. तर झाडांची कत्तल रोखणार कशी?
आता पॅकिंगच्या जागी जिथे प्लास्टिक वापरलं जातं किंवा ज्या प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी कागद, पुठ्ठा याचा वापर होऊ शकतो, असं जर ठरवलं तर मग कागद आणि पुठ्ठा तयार करण्यासाठी वनस्पती आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांची कत्तल सुद्धा आपल्याला परवडणारी नाही. तसं झालं तर आपल्याला निसर्गातून थेट मिळणारा ऑक्सिजनच आपण नष्ट करत आहोत, असं होईल. प्लास्टिकच्या कॅरीबॅग्जवर बंदी आल्यामुळे बाजारात आता मोठ्या संख्येने पेपर बॅग्जची चलती आहे. होमडिलिवरीची पार्सल्स सुद्धा पेपर बॅगमध्ये असतात. त्यामुळे कागदाचा वाढता वापर हा झाडांच्या अस्तित्त्वाच्या दृष्टीने धोकादायक आहेच. म्हणून प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल याचं आधुनिक तंत्र विकसित व्हायला हवं.
आपण काय करायचं?
• सर्वप्रथम प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करायचा.
• कागदाच्या रद्दीप्रमाणे प्लास्टिकसुद्धा भंगारवाल्याला द्यावं.
• पुनर्वापर होऊ शकेल अशीच वस्तू वापरावी.
• प्लास्टिक गोळा करून योग्य विघटन करणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्याशी संपर्क करावा.
• वापरानंतर, आम्ही प्लास्टिक परत घेऊ, अशा पद्धतीने व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.
• प्लास्टिकचा पुनर्वापर करणारे उद्योजक आहेत, त्यांनी पुढे येऊन जनजागृती करावी.
एकूणच काय तर प्लास्टिक हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असताना ते टाळणं तर अशक्य आहे. पण त्याचा कचरा आपल्यासाठी घातक ठरण्यापेक्षा आपण त्याचा पुनर्वापर आणि विघटन कशाप्रकारे करू, याचाच विचार करूया म्हणजे जगभरातल्या या समस्येची थोडीतरी उकल होऊ शकेल.