फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
गुन्हेगारी महाराष्ट्र

पोलिस भरतीत उत्तेजक द्रव्य सापडले

पोलिस भरतीत उत्तेजक द्रव्य सापडले

मुंबई प्रतिनिधी : पोलीस भरतीसाठी गोरेगाव येथे सुरू असलेल्या मैदानी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धावताना स्फुर्ती यावी यासाठी या उमेदवाराने स्टेरॉईड आणि इंजेक्शन आणले होते, ते उत्तेजक द्रव्य पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून संबंधित तरूणाला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

परीक्षेसाठी पात्र असलेल्या ३७४ उमेदवारांना गुरुवारी बोलाविण्यात आले होते. यावेळी प्रत्येक उमेदवारासह त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात येत होते. प्रवेशद्वारावर एसआरपीएसचा एक अधिकारी आणि इतर कर्मचारी संबंधित उमेदवारांची तपासणी करीत होते. यावेळी एका उमेदवाराच्या बॅगमध्ये त्यांना स्टेरॉईड आणि एका खाजगी कंपनीच्या इंजेक्शनची सिरींज सापडली. हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित उमेदवाराविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी ही माहिती वनराई पोलिसांना दिली. त्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी या उमेदवाराविरुद्ध उत्तेजक द्रव्य आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली असता धावताना स्टॅमिना राहावा आणि पायात गोळे येऊ नये म्हणून ते औषधे आणल्याची कबुली त्याने दिली. तो मुंबईतील रहिवासी असून त्याने पहिल्यांदाच पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला होता. त्याने ते औषधे कोठून घेतले, त्याला ते घेण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा तपास पोलीस करीत आहेत. त्याला नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्याला चौकशीसाठी आवश्यकतेनुसार उपस्थित राहण्याची निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यभरात १७ हजार पदांसाठी भरती सुरू आहे. त्यात पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालकासह इतर पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सध्या उमेदवाराची शारीरिक चाचणी सुरू आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरतील. या भरतीसाठी १७ लाख ७६ हजार २५६ उमेदवारांनी अर्ज केला आहे. म्हणजे प्रत्येक जागेसाठी सरासरी १०१ तरूणांनी अर्ज केला आहे. त्यासाठी उच्चशिक्षित तरूणांनीही अर्ज केले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"