पूर्ववैमनस्यातून घरात घुसून तोडफोड ; १२ जणांवर गुन्हा दाखल!

पिंपरी : भोसरी येथे जुन्या भांडणातून १२ जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून तोडफोड केली. ही घटना बुधवारी (३ सप्टेंबर) रात्री खंडेवस्ती, भोसरी येथे घडली.
या प्रकरणात सुरज जयसिंग जाधव (वय १८, खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक प्रशांत जावळे, ऋषिकेश विकास लष्करे, प्रितम सुधीर जावळे, देवांश उर्फ ईल्या, साहिल तुपसौंदर, शुभम उर्फ भुत्या शिंदे, अनुज कुमार, निखील कांबळे, अनुज जाधव, प्रेम शर्मा, प्रेम शिंदे आणि भुर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी ऋषिकेश लष्करे, साहिल तुपसौंदर, निखील कांबळे आणि प्रेम शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घराबाहेर थांबले असताना जुन्या भांडणातून काही आरोपी लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन आले. त्यांनी हवेत काठ्या फिरवून दहशत निर्माण केली आणि भांडण सोडवण्यासाठी जमलेल्या लोकांना धमकावले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून सामान अस्ताव्यस्त केले. घराबाहेर पडल्यानंतर काही आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत धमकी दिली. काही आरोपींनी फिर्यादीची दुचाकी आणि दोन रिक्षांची तोडफोड करून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक!
पिंपरी : पिंपरी येथील डिलक्स चौकजवळ एका व्यक्तीला सार्वजनिक रोडवर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (४ सप्टेंबर) पहाटे घडली.
अजय उदय सिंग उर्फ जिमी (वय ३०, डिलक्स चौक, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार प्रविण शेळके यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना एक लोखंडी कोयता जवळ बाळगला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत अजय याला अटक केली. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.