पुण्यात मुसळधार पाऊसाने सोसायट्यांमध्ये पाणी

पुणे: सततच्या मुसळधार पाऊसामुळे खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. सिंहगड रोडवरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अजित पवार साडेनऊ वाजता मंत्रालयात पोहोचणार आहेत. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुण्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि सतत सुरु असलेला पाऊस यामुळे पुण्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील शाळा बंद
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
पुण्यातील पर्यटनस्थळांवर बंदी
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.