पुणे शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांशी राज ठाकरे याचा संवाद

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधत पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांनी ऐकुन घेतल्या. सिंहगड रस्ता भागातील निंबाज नगर ,एकता नगर भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. या नंतर पुलाच्या वाडीत पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुबियाना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सोमवारीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतरही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले.
महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. यात झालेल्या अतोनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे.