पक्षांतर थांबवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची हूल!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराची चर्चा सुरू झाली होती. त्यातच बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, याबाबतची बातमी लवकरच देणार, असे जाहीर केल्याने इच्छुकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीबाबतचे सादरीकरण केले, तर अजित पवार यांनी शहा यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्तारातील आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित केली. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरहून थेट दिल्ली गाठत याबाबत शहा यांच्याशी चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत, विशेष करुन शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचे सूर उमटत आहेत. मंत्रीपद मिळेल या आशेवर आनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोढली होती.आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय स्थिरता यावी यासाठी शिंदे आणि अजित पवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असून नाराज आमदारांना थांबवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा घडवून आणली जात आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
शिंदे व अजितदादा गटातील आमदार नाराज
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, दोन-अडीच वर्षांत मंत्रीपद न मिळाल्याने शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काही आमदारांनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा घडवून आणली जात आहे, असे बोलले जाते.
दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, तर अनेक आमदार नाराज होतील, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.