ड्रोन करताहेत पिंपरीतलं मालमत्ता सर्वेक्षण

पिंपरी, प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवडमधील मालमत्तांचे महापालिकेच्या वतीने अत्याधुनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्यास आज सोमवार (८ जुलै) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली आहे. या सर्वेक्षणामध्ये वाढीव मालमत्ता, वापरात बदलासह सुमारे दोन लाख नवीन मिळकती सापडतील, असा अंदाज महापालिका प्रशासनाला आहे.
महापालिकेचा मालमत्ता कर हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असून शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. २०२४-२४ या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ९७७ कोटींचा कर जमा केला. दुसरीकडे शहर वाढत असताना मालमत्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक जण मालमत्तांची महापालिकेच्या दप्तरी नोंद करत नसल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यापूर्वी महापालिकेने २०१४ मध्ये सर्वेक्षण केले असता यामध्ये सुमारे ३५ हजार तर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २१ हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या होत्या. मात्र, यानंतरही शहरात नोंद नसलेल्या मोठ्या मालमत्ता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने प्रथमच अत्याधुनिक ड्रोनव्दारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला.
आज सोमवारपासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर कर संकलन विभागाचे उत्पन्न वाढीसाठी विभागाच्या वतीने गेल्या सव्वा दोन वर्षांपासून विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, त्याचेच फलित म्हणून गतवर्षी इतिहासातील सर्वाधिक महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये कर संकलन व कर आकारणी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थापत्य कन्सल्टंट, टेक नाईन आणि फॅाक्सबेरी टेक्नॅालॅाजी यांचाही मोठा वाटा आहे.
सर्वेक्षणात शहरामधील प्रत्येक मिळकतीची नोंद होणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून कर संकलन विभागाचा महसूल दिड हजार कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच वेळी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन अंतर्गत मोजमापे घेणे, क्रमाने (geo-sequencing) करणे, सॅटेलाईट इमेज आणि आता ड्रोनच्या माध्यमातून 5 सेमी रिझोल्युशन असलेली शहराची इमेज यामुळे कुठलीही मालमत्ता कराच्या कक्षेतून सुटणे अशक्य आहे.
आता वाढीव बांधकाम लपून राहणार नाही
स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे ड्रोन सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सध्या महापालिकेकडे शहराचे केवळ ३० ते ५० सेंटीमीटर रिझोलेशनचे सॅटॅलाइट इमेज उपलब्ध आहेत. मात्र, ड्रोन सर्वेक्षण केल्यानंतर ५ सेंटीमीटर रिझोल्यूशनची सॅटेलाइट इमेज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या कक्षेतून एकही वाढीव बांधकाम, नवीन मालमत्ता लपून राहणार नाही. शहरातील प्रत्येक मिळकतीचे अत्यंत सुक्ष्म मोजमाप होणार आहे. त्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेत अद्यापपर्यंत कर मूल्यांकन न झालेल्या जवळपास दोन लाख नवीन मिळकती मालमत्ता कराच्या कक्षेत आणून स्वउत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास महापालिका प्रशासनास शक्य होणार आहे.
महापालिका आपल्या दारी उपक्रम
आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन तंत्रज्ञान विकसित करून आता “मनपा आपल्या दारी” हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना मालमत्ता कर आकारणीबाबत सर्व माहिती एका क्लिकवर प्राप्त होणार आहे. सवलती, भरणा, कर आकारणी संदर्भात आक्षेप दाखल करून सुनावणी प्राप्त करणे, मालमत्ता कर विभागामार्फत केवळ एक सांकेतिक “युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन क्यू आर कोड”विकसित करण्यात येणार आहे. त्यावर स्कॅन करून सर्व मालमत्ता धारकांना घरबसल्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले की, महापालिकेकडे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या डाटामधून नागरिकांना आवश्यक माहिती एकाच ॲप मधून कशी उपलब्ध करून देता येईल याबद्दल पालिका प्रयत्नशील आहे. ड्रोनच्या माध्यमातून मिळालेल्या अनेक अचूक भौगोलिक माहितीचा वापर करून इतर विभागांचे, शहरातील भौतिक सुविधांचे नियोजन करण्यासाठी सुद्धा याची मदत होणार आहे.
मालमत्तांची माहिती एका क्लिकवर
या सर्वेक्षणातून मालमत्तांचे स्थळदर्शक नकाशांचे संगणकीकरण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेली सर्व माहिती संगणकीकृत करुन डिजीटल फोटोग्राफ सह कर मुल्यांकन संगणक आज्ञावलीमध्ये एकमेकांस मालमत्ता निहाय जोडली जाणार आहे. जेणेकरुन कर आकारणी संबंधातील करपात्र क्षेत्रफळ, नकाशा, मालमत्तेचा फोटो व कर आकारणी एकत्रीतपणे संगणक आज्ञावलीद्वारा पाहता येणार आहे.