`डॅडी`ची तुरुंगातून सुटका नाहीच?

मुंबई : मुंबईतला कुख्यात डॉन अरुण गवळी याला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहवं लागण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अरुण गवळीला सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहावं लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या याचिकेवरील पुढची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अरुण गवळीने वयाचे कारण देत सुट्टी देण्याची मागणी केली होती. गँगस्टर अरुण गवळीला न्यायालयाने दिलेल्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आता याच प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून नोव्हेंबरमध्ये या प्रकरणावरील सुनावणी न्यायालय दोन्ही बाजू ऐकणार आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याच गुन्ह्यात अरुण गवळी नागपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गवळी याला सुनावण्यात आलेल्या एकूण शिक्षेपैकी १४ वर्ष शिक्षा त्याने भोगली आहे. गवळीचे वय आता ६५ वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे शिक्षेतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी अरुण गवळी याच्या वकिलाकडून करण्यात आली होती. मात्र त्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.