चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा विधानसभेच्या रिंगणात?

नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील कामठीमध्ये तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देखील २०१९ मध्ये उमेदवारी नाकारलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यंदा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या. मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२४ विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभेत पक्षाचा झालेला पराभव लक्षात घेता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता पक्षाकडून बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २००४ मध्ये प्रथमच तेथे बावनकुळे यांनी भाजपला विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी या मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली होती. २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे ऊर्जा हे महत्त्वाचे खाते सोपविले. त्यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रीपदही होते. याआधारे त्यांनी मतदारसंघावरील पकड अधिक घट्ट केली. असे असताना २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयापुढे मान तुकवत बावनकुळे यांनी पक्षाने दिलेले उमेदवार टेकचंद सावरकर यांच्यासाठी काम करत त्यांना निवडून आणले. मात्र, याचे फळ त्यांना नंतर मिळाले. २०२२ मध्ये त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले. त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदीही नेमण्यात आले. तेव्हापासून बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.