कुंडली नदीपात्रात विसर्ग सुरू

पिंपरी, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागला आहे. नाणे मावळातील वडिवळे धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून कुंडली नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सोमवारी (२२ जुलै) दुपारी धरणाच्या सांडव्यावरून एक हजार १२४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. धरण क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ झाल्यास व पाऊस सुरू राहिल्यास परिस्थितीनुसार वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.