कर्नाटकात बस अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटक : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांच्या बसला गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात. अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपतींनी घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातल्या ब्यादगी तालुक्यात एका मिनी बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला गुरुवारी मध्यरात्री जोरदार धकड दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमधील १३ जणांचा जागीच मृत्यू झाला,तर दोघे जण गंभीर जखमी आहेत सध्या त्यांचावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसमधून प्रवास करणारे सगळे भाविक शिवमोगा येथील राहणारे आहेत असे पोलिसांनी सांगितले.
यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन भाविकांची ही बस सौंदत्तीवरुन निघाली होती. पण मध्यरात्रीच बसवर काळाने घाला घातला. बसमधील सगळे प्रवासी झोपेत असतानाच त्यांना मृत्यूने कवटाळले. कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी तालुक्यात मिनी बसने रस्त्याचा बाजूला उभ्या असणाऱ्या ट्रकला मध्यरात्री धडक दिली. जखमी सु्द्धा गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बसचालकाचा डोळा लागल्याने हा अपघात घडला असावा. बस चालकाला डोळा लागताच त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बंद ट्रकवर ही बस आदळली असे पोलिसांनी म्हटले आहे.

