उंदीर पळवण्यासाठी उपाय हवाय?

उंदरांमुळं घरातल्या वस्तूंचं होणारं नुकसान हे कोणत्याही व्यक्तीला रॅट किलर वापरायला भाग पाडणारं असतं. पण ते करायला कोणी धजावत नाही. मग अशातच प्रत्येकाला उंदीर पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय हवे असतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
घरात उंदरांचा त्रास नेहमीच कटकटीचा असतो. रॅट किलर वापरून घरातले उंदीर अगदी सहज मारता येतात. पण भारतासारख्या देशात जिथं गणपतीचं वाहन उंदीर असल्यानं त्याचीही पूजा केली जाते, तिथं अशा पद्धतीनं उंदीर मारणं अनेकांना पटत नाही. त्यामुळं कपडे कुरतडण्यापासून घरातल्या चीज वस्तूंचं नुकसान होत राहतं. पण उंदरांपासून सुटका हवी असेल तर काही घरगुती उपायही नक्की जाणून घ्या.
पुदिना वापरून पळवा उंदीर
परदेशात झालेल्या एका संशोधनातून आढळलं आहे की, पुदिन्याचा वास उंदरांना आवडत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं पेपरमिंट ऑइल वापरून उंदीर घरातून पळवून लावता येतील. तसंच ते त्या ठिकाणी परत फिरकणार नाहीत, याचीही खात्री आहेच.
कसा वापरावा पेपमिंट?
- कापसाच्या बोळ्यात पेपरमिंट ऑइलचे टाकून तो भिजवावा. ज्या कोपऱ्यांमध्ये उंदीर सर्वाधिक दिसतात, तिथं हे बोळे ठेवा. हा वास तिथं सतत रहावा, यासाठी तीन दिवस सतत हे कापसाचे बोळे बदलावेत.
- पेपरमिंट ऑइल आणखी उग्र करण्यासाठी यात दालचिनी, सिट्रोनेला गवताचं तेल आणि निलगिरी तेल यांचाही समावेश करावा.
- पेपरमिंट ऑइलमध्ये फक्त पाणी मिसळून सुद्धा तुम्ही ते शिंपडू शकता.
- पेपरमिंट ऑइलमध्ये पांढरं व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडर मिसळून ते वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडावं. एक कप पांढरं व्हिनेगर, तीन चार थेंब भांड्यांचं लिक्विड साबण आणि दोन कप पाणी मिसळावं. यात दहा थेंब पेपरमिंट ऑइलचेही घालावेत. या मिश्रणाच्या वासानं उंदीर पळून जातील.
पुदिना किंवा पेपरमिंट वापरणार असाल, तर उंदरांना हा वास का आवडत नाही, हे सुद्धा जाणून घ्या. उंदीर हा खूप संवेदनशील प्राणी आहे. थोडासा सुगंध सुद्धा त्यांना समजतो. पुदिन्याचा उग्र वास आणि वैशिष्ट्यपूर्ण ताजेपणा यामुळं उंदरांना ते आवडत नाही.