इको टुरिझम पार्कला चालना मिळणार

प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने डुडुळगाव येथील वन विभागाच्या जागेवर इको टुरिझम पार्क उभारण्याला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या परिसरात सुमारे एक लाखांहून अधिक सदनिका उभारल्या जात आहेत. भविष्यात हा परिसर रेसिडेन्सिअल कॉरिडॉर म्हणून तयार होणार आहे. अशा वेळी नागरिकांना कामाच्या ताणापासून मुक्त होण्यासाठी टुरिझम पार्कच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. आधुनिक विचारसरणीच्या आधारावर पार्कची संकल्पना विकसित करण्यात येणार आहे.
पालिकेत १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या १८ गावांपैकी डुडुळगाव येथे गट नंबर ७८ आणि १९० या ठिकाणी वनविभागाची सुमारे ६६ हेक्टर ८५ आर जमीन आहे. पालिकेत समाविष्ट असलेले हे क्षेत्र वर्किंग प्लॅननुसार शहरी वनविभागामध्ये येते. या जागेवर प्रस्तावित इको टुरिझम पार्क विकसित करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळण्याची गरज आमदार महेश लांडगे यांनी मुनंगटीवार यांच्याकडे पावसाळी अधिवेशनच्या निमित्ताने व्यक्त केली. प्रकल्पा उभारणीतील अडथळे दूर करण्याची मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
सकारात्मक मार्ग निघणार
या संदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले की, विकासाचा समतोल राखण्याच्या अनुषंगाने समाविष्ट गावांमध्ये विकासकामांना चालना देण्याची गरज आहे. त्यामुळेच निगडी येथील दुर्गा टेकडीच्या धर्तीवर डुडुळगाव येथील वनविभागाच्या जागेवर इको टुरिझम पार्क उभारण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य सरकारशी अनेकदा बैठका झाल्या असून, सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आहे.
डुडुळगावमधील अण्णा भाऊ साठे नगर ते जुनी ग्रामपंचायत रस्ता वनविभागाच्या जागेत आहे. त्यामुळे नागरिकांना घराची नोंदणी करता येत नाही. या भागात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचण निर्माण होत आहे. वनविभागाच्या हद्दीचे नियम लागू असल्यामुळे सोसायट्यांचा विकास खुंटला आहे. रस्ते हस्तांतरणाबाबत तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवून नागरिकांचे प्रश्न निकालात लावण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, याकडेही आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले.
काय आहे इको टुरिझममध्ये?
- नागरिकांसाठी एन्टरमेंट झोन
- लॉन अन् अॅम्पीथिएटर
- पाम कार्ट, फूड कोर्ट
- लाईट अँड साऊंड शो
- थिमवर आधारित खेळ