आंतरधर्मीय जावयाचे अपहरण करून खून

पिंपरी, प्रतिनिधी : तरुणाने आंतरधर्मीय तरुणीसोबत विवाह केला. हा विवाह मान्य न झाल्याने तरुणीच्या नातेवाईकांनी जावयाचे अपहरण करून त्याचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकून पुरावा नष्ट केला. अठरा दिवसानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना अटक केली आहे.
अमिर मोहम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी. मूळ रा. रांधे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे वडिल मोहम्मद कासिम शेख यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, रा. चाकण. मूळ रा. भिंगे आडगाव, ता हिंगोली, जि. हिंगोली), सुशांत गोपाळा गायकवाड (वय २२, रा. रांधे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह गणेश गायकवाड (रा. रांधे, ता. पारनेर जि. अहमदनगर), सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. चाकण, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात १६ जून रोजी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना तक्रारदार महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार महिलेच्या बहिणीचा पती पंकज याने महिलेच्या पतीला फोन करून बोलावून घेतले होते. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांवर संशय बळावल्याने बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या वडिलांची २७ जून रोजी फिर्याद घेण्यात आली. त्यामध्ये महिलेच्या बहिणीचा पती आणि दोन भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी सुशांत गायकवाड याची बहीण निकिता गायकवाड हिच्यासोबत मागील सहा महिन्यांपूर्वी आमिर शेख याने विवाह केला होता. हा विवाह सुशांत गायकवाड आणि त्याच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यावरून सुशांत आणि त्याच्या बहिणीचा पती व चुलतभाऊ यांनी अमीर याला फोन करून दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्याला दारू पाजून चाकण-आळंदी रोडच्या कडेला मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील जंगलात नेऊन दगडाने ठेचून ठार मारले.
त्यानंतर मृतदेह लपवून ठेवला. चौथा आरोपी सुनील चक्रनारायण याच्या मदतीने एलडीओ डिझेल आणून १७ जून रोजी मृतदेह जाळला. त्याची हाडे व राख दोन पोत्यांमध्ये भरून ते नदीत टाकून देत पुरावादेखील नष्ट केला. पोलिसांनी पंकज आणि सुशांत यांना २९ जून रोजी लोणावळा येथून तर आरोपी सुनील याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली. गणेश दिनेश गायकवाड आरोपी फरार आहे.
अमीर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या निकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे कुटुंब वीस वर्षापासून शेजारी राहत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात सलोखा होता. मात्र, दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये मोठी दरी निर्माण झाली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, राजू जाधव, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहूल लोखंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रविण मुळुक, नितिन खेसे, विशाल काळे, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर यांनी केली.