अनिल देशमुखांनी अखेर ‘ते’ नाव सांगितलंच

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. अनिल देशमुख म्हणाले, “समित कदम ५ ते ६ वेळा माझ्या कार्यालयात आले होते. त्यांनीच खोट्या आरोपांचे कागद ठेवलेलं पाकिट मला दिलं होतं.’ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीसांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनीही आपल्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. या दोघांमध्ये व पर्यायाने राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये यावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता अनिल देशमुख यांनी फडणवीसांकडून आलेल्या माणसाचं नाव जाहीर केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.