अजित पवार गटातील नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

पिंपरी, प्रतिनिधी : विधानसभेच्या जागा वाटपात भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ सध्याच्या सिटींग आमदारामुळे भाजपाकडे जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी अजितदादा पवार इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे . त्यामुळे अनेक आजी- माजी नगरसेवक शरद पवार यांच्या संपर्कात आले आहेत.
महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. जागा वाटपात भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात भाजपाचे अनुक्रमे महेश लांडगे व श्रीमती अश्विनीताई जगताप हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे भाजपा हे मतदारसंघ अन्य पक्षांना सोडण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर दावा केला आहे.
जागा वाटपाच्या अनुभवातून शिकणार?
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा अनुभव पाहता पवार गट हे मतदारसंघ आपल्याकडे मिळवू शकणार नाही, अशी धास्ती भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील इच्छुकांना आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी श्रीमती अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका विरोधीपक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी दिली होती. अपक्ष राहुल कराटे हे देखील रिंगणात होते. तेव्हा श्रीमती जगताप निवडून आल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे या दोघांची भाजपा उमेदवारापेक्षा जादा आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली.
पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली
मात्र राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजितदादा पवार यांनी 40 आमदारांसह वेगळा गट तयार केला आणि भाजपा शिवसेना युतीला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील झाले. पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्व आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार गटाला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणूक निकालानंतर अजितदादा पवार गटातील आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. अजित पवार गटात राहिल्यास निवडणुक लढविता येणार नाही . त्यामुळे सुमारे वीस ते बावीस आजी माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे.
भोसरीकरांची माघार नाही
भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी देखील आता माघार नाही अशी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघावर महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा अग्रही दावा असणार आहे. पिंपरी मतदारसंघ संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजपा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम करत आहे. बनसोडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराजी असल्याने महायुतीत या जागेबाबत संघर्ष होण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी करीत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. विधानसभा अधिवेशनानंतर स्वगृही परत जाण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

