फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र राजकारण

विकास कामांसाठी वित्त विभागाकडून निधी

विकास कामांसाठी वित्त विभागाकडून निधी

पिंपरी, प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव मान्य करून घ्यावा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी मुंबईत महसूलमंत्री विखे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. रस्त्याच्या कामांसाठी भूसंपादन मुख्य अडथळा असल्याचे नमूद करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांच्या सुटका व्हावी, यासाठी विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित करण्याची गरज आहे, या मुद्याकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु, भूसंपादनाअभावी रस्त्यांची कामे रखडली आहेत. कामे लांबणीवर पडत आहेत. त्यामध्ये राज्य सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी मागणी लांडगे यांनी केली.

चऱ्होली, मोशी, चोविसावाडी, वडमुखवाडी, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी, तळवडे, चिखली या भागातील १८, ३० आणि ९० मीटर रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने संबंधित विभागांना सूचना देण्याची गरज असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले. त्यावर सकारात्मक भूमिका घेत विखे-पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून घेण्याबाबत राज्याच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव मान्य करून घ्यावा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या रस्त्यांना मिळणार गती

  • चऱ्होलीतील १८ व ३० मीटर रुंद रस्ते
  • मोशी व चऱ्होलीतील ९० मीटर रुंद रस्ते
  • तळवडे व चिखली भागातील सात रस्ते
  • इंद्रायणी नदी किनारी रस्ता विकसित करणे
  • इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी जागा संपादन
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"