फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

धबधब्यात उडी मारलेल्या जवानाचा मृत्यू

धबधब्यात उडी मारलेल्या जवानाचा मृत्यू

पिंपरी, प्रतिनिधी : सैन्य दलातून निवृत्त झालेल्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडूचा ताम्हिणी घाटातील एका धबधब्यात उडी मारल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (३० जून) दुपारी घडली. या खेळाडूचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळला.

स्वप्नील संपत धावडे (वय ३८, रा. धावडे वस्ती, भोसरी) असे मृत्यू झालेल्या राष्ट्रीय खेळाडूचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, स्वप्नील धावडे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. अठरा वर्षे सेवा बजावल्यानंतर अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले होते. ते बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. सेवानिवृत्ती नंतर एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते.

जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत स्वप्नील हे रविवारी ताम्हिणी घाटात फिरायला गेले होते. तिथे प्लस व्हॅली येथे धबधब्याच्या कुंडात स्वप्नील यांनी उडी मारली. दरम्यान त्यांचा एक सहकारी याचा व्हिडिओ बनवत होता. स्वप्नील यांनी धबधब्याच्या कुंडात उडी मारल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बाजूला येण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले.

पौड पोलीस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी संयुक्तपणे स्वप्निल यांची शोध मोहिम राबविली. मात्र, या पथकांना कोठेही स्वप्निल आढळून आले नाहीत. पाण्याचा जोर वाढत असल्याने शोध कार्यात अडचणी येत होती. दरम्यान, भुशी येथील दुर्घटनेतील मयतांना शोधण्यासाठी काही पथके भुशी धरण परिसरात रवाना झाली.

रविवारी काही पथकांकडून शोध कार्य सुरू होते. रात्री पर्यंत स्वप्नील यांचा शोध न लागल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्यास सुरुवात केली असता रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे स्वप्निल यांचा मृतदेह आढळून आला.

स्वप्नील हे पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील नेमबाज रश्मी धावडे यांचे पती होते. स्वप्नील यांचा मृतदेह माणगाव येथून भोसरी येथे आणण्यात आला. येथे तळ्याकाठी सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"