कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात?

पीटीआय , नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना रणौत अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना रणौत यांच्याकडून २१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ही याचिका किन्नौरचे रहिवासी अपक्ष उमेदवार लायक राम नेगी यांनी दाखल केली आहे. विहित निकषांची पूर्तता करूनही त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला, असा युक्तिवाद त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. अशा परिस्थितीत कंगना रणौत यांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
रिटर्निंग ऑफिसरवर ठपका ठेवत त्यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. लायक राम नेगी हे वनविभागाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आणि उमेदवारी अर्ज भरताना रिटर्निंग ऑफिसरकडे थकीत नसलेली प्रमाणपत्रेही सादर केले. वीज, पाणी, दूरध्वनी आदी विभागांकडून थकीत नसलेली प्रमाणपत्रे घेण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, नेगी यांनी सर्व दाखले सादर केले असता, निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याचा दावा केला जात आहे.