फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

बचतगटाच्या महिलांनी ३ हजार १४५ स्कूल बॅग शिवून मिळवले लाखो रुपयांचे उत्पन्न!

बचतगटाच्या महिलांनी ३ हजार १४५ स्कूल बॅग शिवून मिळवले लाखो रुपयांचे उत्पन्न!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘सक्षमा’ प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक ‘सक्षम’ करण्यास उपयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत राबवण्यात येणारा सक्षमा प्रकल्प हा बचतगटांच्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यास उपयुक्त ठरत आहे. या प्रकल्पांतर्गत नुकत्याच जागृती महिला बचत गट आणि गुरूकृपा महिला बचत गटाच्या महिलांनी तब्बल ३ हजार १४५ स्कूल बॅगचे शिवण कामे पूर्ण करून तब्बल १२ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

महिला बचत गटांना सशक्त व सक्षम करण्यासाठी, त्यांना नागरी व आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सक्षमा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या जागृती महिला बचत गट व गुरूकृपा महिला बचत गटाच्या महिलांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग शिवण्याचे मिळाले काम पूर्ण केले आहे.

viara vcc
viara vcc

या दोन्ही बचतगटांना २९ मे २०२५ रोजी ३ हजार १४५ स्कूल बॅग शिवण्यासाठी कार्यादेश देण्यात आला होता. त्यानंतर या बचत गटाच्या महिलांनी वेगाने काम सुरू केले. साहित्य खरेदी, ३ हजार १४५ स्कूल बॅगचे शिवणकाम, या बॅगची गुणवत्ता तपासणी आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष स्कूल बॅग पुरवणे, हे काम या महिलांनी केवळ एका महिन्यात पूर्ण केले.

जागृती महिला बचत गटाच्या पुष्पा सौदा, प्राची कदम, हर्षा जंगले आणि चित्रा मोरे, गुरुकृपा महिला बचत गटाच्या शिल्पा कणसे, सांगिता घुले, अनुराधा बेदरे, श्रावणी कणसे या महिलांनी स्कूल बॅग शिवण्याची १२ लाख ५८ हजार रुपयांची ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सक्षमा प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेऊन स्कूल बॅग शिवण्याचे काम पूर्ण करणाऱ्या या महिलांनी खऱ्या अर्थाने आता स्वावलंबनाची वाट धरली असून त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

आयुष्य बदलण्यासाठी सक्षमा ठरतोय उपयुक्त :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा सक्षमा प्रकल्प हा आमचे आयुष्य बदलण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याच्या भावना जागृती महिला बचत गट आणि गुरूकृपा महिला बचत गटाच्या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. जागृती महिला बचत गटाच्या प्राची कदम म्हणाल्या, ‘यापूर्वी आम्ही फक्त आमच्या परिसरातच बॅग तयार करून विकत होतो. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिळालेल्या स्कूल बॅगच्या ऑर्डरमुळे मोठी स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. आमच्या बचत गटाला एखाद्या शासकीय संस्थेकडून अशी ऑर्डर प्रथमच मिळाली होती. ती वेळेत पूर्ण करता आली, याचा आनंद आहे.

गुरुकृपा महिला बचत गटाच्या श्रावणी कणसे यांनी सांगितले की, ‘स्कूल बॅगची ऑर्डर मिळाली तेव्हा ती वेळेत पूर्ण करता येईल का, असे वाटत होते. परंतु आम्ही सर्व महिलांनी एकमेकांना साथ देत ती पूर्ण केली. आता आम्हाला विश्वास आहे की, आम्ही याहूनही मोठ्या ऑर्डर्स सहज पूर्ण करू शकतो. आमच्यासाठी ही ऑर्डर रोजगारासाठी एक नवे क्षितिज उघडणारी ठरली आहे.’

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"