फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

धनेश्वर मंदिर गोशाळा भूमिपूजन सोहळ्यात इच्छुकांची ठोलेबाजी

धनेश्वर मंदिर गोशाळा भूमिपूजन सोहळ्यात इच्छुकांची ठोलेबाजी

चिंचवड : चिंचवडगाव येथील पूरातन धनेश्वर महादेव मंदिरात गोशाळेच्या जिर्णोध्दारासाठी आमदार निधीतून ४० लाखाचा निधी अश्विनी जगताप यांनी दिला. या विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर समिती आणि गावकऱ्यांतर्फे आयोजित या सोहळ्यात भाजपचे संभाव्य उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा खटाटोप होता, प्रत्यक्षात तिथे शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात चिंचवड मतदार संघातील इच्छुक जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीच बाजी मारली. चिंचवडची युवाशक्ती तसेच तमाम गावकी भावकी भोईर यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे दिसून आले.

चिंचवडकरांचे श्रध्दास्थान असलेल्या धनेश्वर महादेव मंदिर आवारात प्रशस्थ गोशाळा आहे. मंदिराशेजारी उद्यान आणि गोशाळेचा विस्तार असा हा प्रकल्प आहे. या कामाला कोटींवर खर्च अपेक्षित आहे. मदत म्हणून चिंचवडमधून भाजपकडून विधानसभेची उमेदवारी करू पाहणाऱ्या शंकर जगताप यांनी दानशूरपणा दाखवला. अश्विनीताईं जगताप यांनी आमदार निधीतून ४० लाख रुपये मंजूर केले आणि व्यक्तीगत मदतीचे आश्वासन दिले. निधी मिळाला म्हणून मंदिर समितीने आमदार अश्विनीताई जगताप आणि शंकर जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता.

अत्यंत पवित्र अशा या महादेव मंदिरातील हा पहिलाच असा कार्यक्रम होता. शंकर जगताप आणि आमदार अश्विनीताई यांचीही समयोचित भाषणे झाली. भोईर यांनी आपल्या आभार प्रदर्शनात जगताप कुटुंबियांच्या दात्त्वृत्वाचा आणि सहकार्याचा यथोचित गौरव केला आणि गावकऱ्यांच्यावतीने ऋण व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी एक खंत व्यक्त केली. आजचा सोहळा संस्मरणीय आहे पण, एक खंत वाटते. धार्मिक कार्य म्हणून सिध्दिविनायक ग्रुपचे राजूशेठ सांकला यांच्यामदतीने आम्ही २० लाख रुपये खर्च करून २००८ मध्ये मंदिराच्या समोर सभामंडपाचे काम केले. आज विचार केला तर ते कोटींच्या पुढचे काम होते. आम्ही कुठेही त्याचा गवगवा केला नाही. मात्र, त्यावेळी असाच सोहळा झाला असता तर खूप बरे वाटले असते. आम्ही केलेली मदत ही देवासाठी होती, त्याचा राजकारणासाठी उपयोग नाही केला. दरम्यान, भोईर यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तरुणाईने शिट्ट्या वाजवत भोईर यांना प्रतिसाद दिला.गावकी यावेळी अपक्ष उमेदवार असले तरी भोईर यांच्यामागे ठामपणे उभी असल्याचे दर्शन झाले. भोईर यांनी आभार प्रदर्शन करता करता जे भाषण केले त्यात त्यांच्याच प्रचाराचा नारळ फुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.

चिंचवडगाव पंचक्रोशितले दोन अडिचशे गावकी म्हणजेच कारभारी मंडळी उपस्थित होते. आजी-माजी नगरसेवकांपैकी भाऊसाहेब भोईर, शाम वाल्हेकर, मधूकर चिंचवडे, हनुमंत गावडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, हरि तिकोणे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, करुणा चिंचवडे अवर्जून उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"