विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : अंकुर, मंथन, कलयुग, निशांत, भूमिका, जुबैदा अशा एकापेक्षा एक उत्कृष्ट सिनेमा नावावर असणारे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज (सोमवार) संध्याकाळी वॉकहार्ट रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. नुकताच १४ डिसेंबर रोजी त्यांनी आप्तेष्ट आणि कुटुंबियांसह आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.
बॉलिवुडमध्या आर्ट फिल्म्सचा जनक म्हणूनही श्याम बेनेगल यांचे नाव आवर्जून घेतले जाते. वयाच्या बाराव्या वर्षी श्याम बेनेगल यांनी पिता श्रीधर बी बेनेगल यांनी दिलेल्या कॅमेऱ्यातून आपली पहिली फिल्म तयार केली होती. अंकुर या सिनेमापासून दिग्दर्शक म्हणून त्यांनी बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवलं. आणि या पहिल्याच सिनेमाने ४३ पुरस्कार मिळवले होते. त्यानंतर मंथ, कलयुग, निशांत, आरोहण, जुनून यासारखे अनेक नावाजलेले सिनेमे त्यांनी रसिकांपुढे ठेवले.
श्याम बेनेगल यांच्या ९० व्या वाढदिवशी अभिनेता कुलभूषण खरबंदा, नसिरुद्दीन शाह, दिव्या दत्ता, शबाना आझमी, रजत कपूर, अतुल तिवारी यांच्यासह अनेक चित्रपट निर्माते आणि अभिनेता उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी ५० वर्षे योगदान दिले आहे. अनेक उत्तमोत्तम सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. अर्थशास्त्रातील शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फोटोग्राफी सुरू केली होती.
पद्म पुरस्कारांनी गौरव
सिनेमाच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल श्याम बेनेगल यांना १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. तसंच नंतर २००७ मध्ये सिनेक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच त्यांच्या सात सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
बेनेगल यांच्याबद्दल काय म्हणाल्या होत्या इंदिरा गांधी
श्याम बेनेगल यांच्या सिनेमांचे कौतुक दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही केले होते. त्यांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या होत्या की, श्याम बेनेगल यांचे सिनेमे म्हणजे माणुसकीचं मूळ शोधणारी कलाकृती असते. सत्यजीत रे यांच्या निधनानंतर त्यांची धुरा श्याम बेनेगल यांनी सांभाळली होती.