प्रसिद्ध साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

मुंबई, प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरूवारी पहाटे वसईतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. संध्याकाळी ६ वाजता विरारच्या नंदाखाल येथील चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘सुवार्ता’चं संपादक पद त्यांनी दीर्घकाळ सांभाळलं होतं. तसंच ते पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जात. फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर १९४२ या दिवशी वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. दिब्रिटो १९८३ ते २००७ या कालावधीत ‘सुवार्ता’ या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. १९७२ या वर्षी त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत त्यांच्या जेलाडी येथील राहत्या घरी ठेवण्यात आले. त्यानंतर नंदाखाल (विरार) येथील पवित्र आत्म्याचे चर्च येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.